Tuesday, September 27, 2016

नैसर्गिक शेती काळाची गरज

विनाशकाले विपरीत बुद्धी!

अॅड. गिरीश राऊत 

पृथ्वीवर किती धान्य पिकवू शकतो किंवा किती गोडे पाणी वापरू शकतो याला नैसगिर्क मर्यादा आहेत. 'मार्केट सरप्लस'ची कल्पना सोडून 'भुकेसाठी अन्न' (फूड सरप्लस) ही संकल्पना रुजली पाहिजे. या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राला सवतीची वागणूक देणे घातक आहे. उद्योगांचा उदो उदो करून, शेती यापुढे कशी न्याय देऊ शकणार नाही, याचे चित्र रंगविले जात आहे. ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आहे. 

................ 

जगाला केवळ सहा आठवडे पुरेल एवढाच अन्नाचा साठा शिल्लक असल्याचे यूनोने स्पष्ट केले आहे. खाद्यान्नाचे उत्पादन घटण्यास मोठे कारण 'जागतिक तापमान वाढ' हे आहे. तृणधान्य, कडधान्य आणि भाजीपाला व कंद तसेच सर्वच वनस्पतींच्या सर्जनाचा, फलनाचा व वाढीचा तापमानाशी थेट संबंध आहे. घटणाऱ्या भूजलामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. 

औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे नैसगिर्क अधिवासांचा नाश झाला आणि जैविक विविधता संपुष्टात आली. किटक व इतर परागीभवनास मदत करणाऱ्या जिवांच्या नाशामुळे फलधारणा घटत गेली. ४० वर्षांपूवीर् हरित क्रांतीचा प्रयोग झाल्यानंतरच्या काळात जैव तंत्रज्ञानाकडे वळावे लागले. हे हरित क्रांती अयशस्वी झाल्याचे निदर्शक होते. त्यानंतर जनुक तंत्रज्ञानाकडे धाव घेणे हे जैव तंत्रज्ञानाचे अपयश अधोरेखित करते. आता भात, गहू, बार्ली, मका इ. उत्पादनासाठी नैसर्गिक तृण जातींऐवजी बदल केलेल्या वृक्ष जातींच्या स्वरूपाचा वापर करावा, अशा दिशेने तथाकथित आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक जात आहेत. या समर्थकांना यातील धोके व फोलपणा विज्ञानाचे ख-या अर्थाने आकलन झालेले नसल्याने लक्षात येत नाही. 

किटकनाशकांच्या वापरात व विषाच्या तीव्रतेत १० पट वाढ होऊनही पूर्वीच्या तुलनेत दुप्पट पीक गमावले जात आहे. कृषीउद्योग व सरकारांच्या एकत्रित दबावामुळे जगभर पिकांच्या स्थानिक जाती हटविल्या गेल्या. कीड व वाईट हवामानाला तोंड देण्याची त्यांची क्षमता हरित क्रांतीने आणलेल्या औद्योगिक जातींपेक्षा जास्त होती. त्या जनुकीयदृष्ट्या जास्त सक्षम होत्या. या स्थानिक जाती सतत उत्क्रांत होत स्वत:मध्ये नव्या क्षमता निर्माण करीत होत्या. औद्योगिक युगात प्रयोगशाळेतील जातींना किडींपासून वाचविण्यासाठी संकर घडविणाऱ्यास सतत स्थानिक मातीतील जातींच्या जनुकीय शहाणपणावर प्रत्यक्षपणे अथवा बीज बँकांतफेर् अवलंबून राहावे लागते; परंतु आंधळ्या औद्योगिक युगात स्थानिक जाती झपाट्याने गमावल्या गेल्याने प्रयोगशाळेतून आलेल्या जातींना लांबच्या पल्ल्याच्या स्पधेर्त किडींच्या एक पाऊल पुढे राहणे, वर्चस्व ठेवणे अशक्य झाले. त्यातच रासायनिक माऱ्याने व नजीकच्या जंगलांच्या ऱ्हासामुळे किडींचे नैसगिर्क भक्षक नष्ट झाले. 

मॉनसॅटोसारख्या महाकाय कंपन्यांनी तणरहित व नांगर-रहित शेतीचा दावा करणे हा तर विनोदी प्रकार होता. आधी या कंपनीची 'राऊंडअप'सारखी जहाल तणनाशके वापरायची, नंतर त्यांचा पिकांवरही वाईट परिणाम होतो. म्हणून त्यांना तोंड देणारी बियाणी याच कंपन्यांनी आणली. शेतक-यांनी दोन्ही कृत्रिम गोष्ट विकत घ्यावयाच्या. याचा अंतिम परिणाम जमीन मृत होण्यात होतो. या सर्व खटाटोपापेक्षा गांडुळे व जिवाणूयुक्त जमीन राखल्यास त्याचे शाश्वत स्वरूपात अनेक फायदे होते. राख व मशागत करून विशिष्ट वेळी प्रमाणात पाणी परंपरागत पद्धतीने साचवून तणांना रोखता येत होते; परंतु मग या बड्या कंपन्या कशा चालणार? 

युरोपातील सुमारे ८५ टक्के जमीन ही शेतीतील रसायनांच्या माऱ्यापासून ते 'आम्लयुक्त पाऊस' अशा औद्योगिकीकरणाने जन्म दिलेल्या अनेक कारणांमुळे 'नि:सत्व व विषारी' बनली आहे. तापमानवाढीमुळे खनिज इंधनांविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. हे इंधनही नजीकच्या भविष्यात संपणार आहे, म्हणूनही कदाचित असेल, पण वनस्पतीजन्य तेल मिळविण्याची टूम काढली गेली आहे. 'जेट्रोफा'सारख्या वनस्पती तेलामुळे हरितगृह परिणाम करणारे वायू तयार होतच राहतील, उलट शेतीखालील क्षेत्र लागवडीखाली आणल्याने अन्नाचे उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणावर घटेल यात शंका नाही. 

कृषी विद्यापीठांनादेखील याबाबत मूलभूत विचार करून भारतीय परंपरागत शेतीची ताकद समजावून घ्यावी, असे वाटत नाही. ५० वर्षांपूवीर्पर्यंत केवळ भारतातच पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवजन्य प्रयोगशील शहाणपणातून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये विकसित केलेल्या भाताच्या सुमारे दोन लाख जाती होत्या. मातीचा पोत, उपलब्ध पाणी व इतर घटकांचा विचार करून खाचरागणिक वेगळ्या जाती लावण्यात येत, हे आजही जुना शेतकरी सांगेल; परंतु आधुनिकतेच्या नावाखाली ही अमूल्य जैविक विविधता नष्ट केली गेली. त्याऐवजी प्रयोगशाळांनी पुरस्कृत केलेल्या निवडक जाती लादल्या गेल्या. संशोधनाबाबतही चुकीचे दावे केले जातात. उदा. खारफुटीच्या जनुकांचा वापर करून जनुकीय तंत्रज्ञानातफेर् भरतीच्या खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात जगणाऱ्या भाताच्या जाती तयार करण्याच्या बढाया मारल्या जातात. परंतु ठिकठिकाणी

अगदी कोकणात, ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यावर शेकडो वर्षांपासून 'कोळपी' ही भाताची जात लावली जातच होती. स्थानिक जातींची नाळ पर्यावरणाशी जोडलेली होती. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींची सार्वत्रिक शिफारस दूरगामी विचार करता चुकीची होती. 

पावसाचे आदिम काळापासूनच अचूक वेळापत्रक मोडलेले या पिढीच्या काळात आपण पाहिले. अतितीव्र उन्हाळा आणि हिवाळा आपण अनुभवतो. भर उन्हाळ्यात हिमवर्षाव व गारपिटी होत आहेत. सातत्याने अवर्षण आणि अतिवृष्टीचा खेळ आपण पाहत आहोत. अन्नोत्पादन व इतरदृष्ट्या ही धोक्याची घंटा राहिली नसून, प्रत्यक्ष आपत्ती सुरू झाली आहे. 

या प्रश्नाचे दुसरे महत्त्वाचे अंग म्हणजे जागतिकीकरणाच्या नावे सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडली गेली. बाजारच परिस्थिती नियंत्रित करील, असे म्हणून सरकारने आपली जबाबदारी झटकली. ही स्थिती काही जागतिक कंपन्यांना उपयुक्त होती. आज बहुतेक देशांच्या अन्नसाठ्यांवरच नव्हे, तर उत्पादन पद्धतीवरही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या महाकाय कंपन्यांचे नियंत्रण आहे. पर्यायाने मानवी जीवनावरच नियंत्रण आहे. त्याच देशांची आयात-निर्यात धोरणे व निर्णय ठरवित आहेत. त्यामुळे सरासरीने सर्वाधिक उष्मांकयुक्त अन्न सेवन करणाऱ्या अमेरिकेतही एक कोटी २० लाख गरीब कुटुंबांना पुढील जेवणाची चिंता भेडसावत आहे. 

एकप्रकारे इतर ऊर्जाप्रमाणेच अन्न ही उर्जाही अधिकाधिक निर्माण करण्यावर भर दिला गेला. पण प्रश्न दोन्हीकडे सारखाच आहे. ही ऊर्जा कोणासाठी होती? दुसरे असे की, शाश्वत स्वरूपात ही ऊर्जावाढ शक्य आहे काय? नफ्याचाच विचार करून अर्थव्यवस्थेचे वारू उधळणाऱ्यांना वाढीला मर्यादा नाही असे वाटते; परंतु पृथ्वीवर किती धान्य पिकवू शकतो किंवा किती गोडे पाणी वापरू शकतो याला नैसगिर्क मर्यादा आहेत. 'माकेर्ट सरप्लस'ची कल्पना सोडून 'भुकेसाठी अन्न' (फूड सरप्लस) ही संकल्पना रुजली पाहिजे. 

या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राला सवतीची वागणूक देणे घातक आहे. उद्योगांचा उदो उदो करून, शेती यापुढे कशी न्याय देऊ शकणार नाही, याचे चित्र रंगविले जात आहे. ही 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आहे. शेतीचे म्हणवले जाणारे अपयश आधुनिक शेतीच्या संदर्भात आहे आणि ते खरे तर औद्योगिकीकरणाचे अपयश आहे. शेती ही नैसगिर्क व जैविक घडामोड उरलीच नव्हती. शेतीच्या रूपात उद्योगच काम करीत होते. परंपरागत शेतीने भटक्या अवस्थेनंतर सुमारे दहा हजार वषेर् मानवाला पर्यावरणस्नेही स्थिर जीवन दिले होते. आताच्या भीषण समस्या व अनिश्चितता अल्पकालीन औद्योगिकीकरणाने निर्माण केल्या आहेत. जर उरलेली शेती मोडली, तर मानवजात काय खाणार आहे? आफ्रिकेतील रस्त्यांवर सुरू झालेले दंगे उद्या जगभर होणार आहेत. आपला देशही अपवाद नसणार. 

No comments:

Post a Comment